TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2021 – कोरोना काळात आता नवी दिल्लीतील शाळा पुन्हा उघडणार आहेत. शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करताना दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) प्रत्येक वर्गात 50 टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शाळांमध्ये येण्यास परवानगी दिली.

याबाबत डीडीएमएने म्हटले आहे की, शाळांनी कोविड -19 नियमांचे पालन करून वर्ग-खोल्यांच्या विद्यार्थी क्षमतेनुसार वेळापत्रक तयार केलं पाहिजे. कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी, शिक्षक यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये येऊ दिले जाणार नाही.

शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी,सकाळच्या सत्रात शाळेला आलेल्या विद्यार्थ्यांची शाळा सुटण्याची वेळ आणि दुपार किंवा संध्याकाळच्या दुसऱ्या सत्रातल्या विद्यार्थ्यांची शाळा भरण्याची वेळ यात किमान एक तासाचे अंतर असावे. विद्यार्थ्यांनी दुपारचे जेवण, पुस्तके, कागद आणि स्टेशनरी वस्तू एकमेकांसोबत शेअर करू नये, अशा सूचनाही दिल्यात.

मागील आठवड्यात डीडीएमए समितीने दिल्लीतील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत अहवाल सादर केला होता. तसेच ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याची शिफारस केली होती. याबाबत शुक्रवारी निर्णय घेतला. 1 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने शाळा पुन्हा सुरू होतील,असा निर्णय घेतला.

इयत्ता 9 वी ते 12 वीचे विद्यार्थी 1 सप्टेंबरपासून शारीरिक वर्गात उपस्थित राहू शकतात, तर सहावी ते आठवीचे वर्ग आठवड्यानंतर ऑफलाइन पुन्हा सुरू होतील. या घटनाक्रमानंतर दिल्लीतील पालकांत मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी सुरू झालीय.