टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 6 सप्टेंबर 2021 – येत्या १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षा अर्थात NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. NEET UG परीक्षा २०२१ दुसऱ्या तारखेला घेण्याबाबतची मागणी सर्वोच्च न्यायालयामध्ये केली होती.
परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका अॅड सुमंत नकुलाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. याबाबत याचिकाकर्त्याने म्हटले होते की, NEET परीक्षेची तारीख सीबीएसई कंपार्टमेंट आणि अन्य परीक्षेच्या तारखा सारख्या असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी. पण, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की येत्या रविवारी १२ सप्टेंबर रोजी NEET परीक्षा निर्धारित वेळेवर घेण्यात येईल.
याबाबत न्यायालयाने म्हटले की, १६ लाखांहून अधिक विद्यार्थी NEET परीक्षेला बसत असतात आणि केवळ काही विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून ही परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती सीटी रवी कुमार यांच्या खंडपीठाने म्हटले की, या याचिकेवर आम्ही सुनावणी घेणार नाही. आम्हाला अनिश्चिततेची परिस्थिती नकोय. परीक्षा होऊ द्या.
यावर न्यायालयाने असेही म्हटले की, शिक्षणाच्या बाबतीत अधिक हस्तक्षेप करण्याची इच्छा नाही. कारण, लाखो विद्यार्थी त्यांच्या आदेशामुळे प्रभावित होतील. आम्हाला खरोखरच न्यायालयीन हस्तक्षेपाची व्याप्ती निश्चित करण्याची आवश्यकता आहे. या विद्यार्थ्यांनी हवे, तर मध्यरात्री जागून तयारी करावी. न्यायालय म्हणून आम्ही किती हस्तक्षेप करू शकतो?.