मुंबई: माध्यमांशी संवाद साधतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी परमबीर सिंह हे देशाबाहेर पळून गेल्याचा संदर्भ देताना ते अनेक देशांमध्ये फिरत असल्याचे राऊत म्हणाले.
यासंदर्भात बोलतांना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात दिवाळी हा पवित्र आणि महत्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना दिवाळीत अटक करण्यात आलीय. तुम्ही यातून काय दाखवताय?त्यांना चौकशीला पुन्हा बोलवता आले असते. अनेकांना बोलवतात. हे क्रौर्य आहे अमानुषता आहे. जी भारतीय जनता पक्षाच्या प्रेरणेतून केंद्रीय तपास करतायत त्यातून हे निर्माण झालंय.
त्यांच्यावर एका पळून गेलेल्या अधिकाऱ्याने आरोप केलाय. तक्रारदार हजर पाहिजे ना. फिर्यादी कुठे आहे. फिर्यादी पण साधा नाही डीजी लेव्हलचा अधिकारी आहे. तो कुठे जातो, कुठे गायब होतो देशालाही माहिती नाही. सक्षम केंद्रीय गृहमंत्रालयाला, आयबी, रॉला माहितं हवं ना कुठंय तो, का तुम्हीच त्याला लपवून लावलाय, पळवलाय. जोपर्यंत तक्रारदार हजर होत नाही तोपर्यंत देशमुखांची अटक ही बेदकायदेशी आहे, असेही राऊत म्हणाले.