TOD Marathi

नांदेड: नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. असं असलं तरी ३ पक्षात प्रामुख्याने ही लढत झाली. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

अनुसुचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर, भाजपचे उमेदवार सुभाष साबणे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम रामराव इंगोले निवडणूक रिंगणात होते. देगलूर विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य करतो असे भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांनी म्हंटल आहे, पराभवाने खचून न जाता भाजपातच राहून पुन्हा जोमाने कामाला लागू असं सुभाष साबणे म्हणाले.