TOD Marathi

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता रंगत यायला सुरुवात झाली आहे. (Andheri East Bye Election) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत तर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या वतीने भाजपचे मुरजी पटेल हे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. (Rutuja Latke Shivsena Thackeray group vs Murji Patel BJP) दोन्ही गटांच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. ऋतुजा लटके यांच्यासह आदित्य ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी, भाई जगताप या नेतेमंडळींसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. त्याचबरोबर मुरजी पटेल यांच्यासह मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित आहेत.

शक्ती प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूंनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. (Rutuja Latke and Murji Patel filing nomination for Andheri East Bye Election) जोरदार घोषणाबाजी करत हे शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. मुरजी पटेल यांनी यापूर्वीही अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक लढवलेली आहे. तेव्हा या निवडणुकीत काँग्रेसचेही उमेदवार होते मात्र आता होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याच बरोबर सीपीआय अशा पक्षांनी उद्धव ठाकरे यांना भेटून ऋतुजा लटके यांना आधीच समर्थन दिलेलं आहे. त्यामुळे ही लढत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिंदे गट अशी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणुका आहे, त्यामुळे ही निवडणूक अनेक अर्थांनी शिवसेनेतील दोन्ही गटांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे.