TOD Marathi

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा संघर्ष रंगण्याची चिन्ह दिसत आहेत. 3 नोव्हेंबरला होणारी ही पोटनिवडणूक दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात हा ‘सामना’ असणार आहे. दोन्ही बाजूंनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी अर्थातच दोन्ही बाजूंचे प्रमुख नेते उपस्थित होते.

भाजपचे उमेदवार मुरजी पटेल उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. यावेळी आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर देखील टीका केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचे नाव बदलून ‘रडकी सेना’ ठेवायला हवे. सत्तेत असताना केंद्र सरकारच्या नावाने रडत होते, आता विरोधी पक्षात असताना न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या नावाने रडत आहेत. बाळासाहेबांचे शिवसेना एकनाथ शिंदे तर उद्धव ठाकरेंबरोबर रडकी शिवसेना आहे, असा टोला आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

अंधेरी पूर्व निवडणुकीबात दीपक केसरकरांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सहानुभूती असती तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला असता. मुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांचं मन मोठं आहे. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजीत कदम यांना शिवसेना आणि भाजपने पाठिंबा दिला होता, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यासाठी सर्वांनी पुढे यावं लागतं. सर्वांनी एकत्र येण्याची विनंती करावी लागते, असेही दीपक केसरकर म्हणाले.