जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव शहर व ग्रामीण जिल्हा यांच्यातर्फे खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत वाढत्या महागाईच्या विरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ गोंधळ घातला गेला तसेच महागाईची प्रतिकात्मक तिरडी बांधण्यात आली.
महागाई इतकी वाढली आहे की गेला महिनाभर आमच्या घरात लिंबू सरबत बनत नाही. आम्ही केंद्रात सत्तेत असताना गॅस सिलिंडरचा दर ३५० रुपये इतका होता. तेव्हा मोदीजी म्हणायचे “बहुत हो गयी महगाई की मार, अबकी बार मोदी सरकार”. आता गॅस सिलिंडरचे दर १००० रुपये झाले आहेत. त्यामुळे “बहुत हो गयी महगाई की मार, अबकी बार किसकी सरकार?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.
देशात महागाईऐवजी जानेवारी महिन्यात हिजाबचा मुद्दा उचलला गेला, फेब्रुवारीत काश्मीर फाईल्सचा प्रचार केला गेला, मार्च महिन्यात भोंगे, लाऊडस्पीकर आले, एप्रिल महिन्यात हनुमान चालिसा गायली गेली आणि आता मे महिन्यात ज्ञानवापी मंदिराचा मुद्दा उचलला जात असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
केंद्र सरकारने एक लक्षात ठेवावं की, कोरोना काळात कोणताही माणूस उपाशीपोटी मृत्यू पावलेला नाही. याचं सर्वात जास्त श्रेय हे शेतकऱ्याला जातं. कोरोना काळात लोक शहरांऐवजी गावाकडे पळत होते. पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे. राज्यातल्या प्रश्नांवर चर्चा केली पाहिजे. आमचीही चर्चेची तयारी आहे. मात्र ऊठसूट तुम्ही महाराष्ट्र सरकारवर टीका करता, असेही त्या म्हणाल्या.
काल पुण्यात झालेल्या घटनेवर देखील त्यांनी भाष्य केलं. काल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जी पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगिनी महागाईच्या मुद्द्यावर त्यांना भेटू इच्छित होत्या. त्यांना स्मृतीजींना निवेदन द्यायचे होते. मात्र पोलिसांनी त्यांना भेट नाकारली. बालगंधर्व सभागृहातून त्यांना बाहेर नेत असताना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्याने आपल्या एका भगिनीवर हात उचलला. सर्वांनी व्हिडीओ पाहिला आहे. आज आमची महिला भगिनी हॉस्पिटलमध्ये आहे. हाच यांचा पुरूषार्थ आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी केला. महिलांचा मानसन्मान झालाच पाहिजे. हिम्मतच कशी झाली त्या पुरूषाची एका महिलेवर हात उगारायची. त्यांच्या पक्षाला लाज वाटली पाहिजे, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.