TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 25 जून 2021 – पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयामध्ये मोहिते यांनी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या समवेत त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रवेशाची घोषणा पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली. यावेळी खासदार वंदना चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सुबोध मोहिते म्हणाले, शरद पवार हे ‘अनडाऊटेबल हिरो ऑफ इंडियन पॉलिटिक्स’ आहेत.

लोकसभेमध्ये सुबोध मोहिते यांचे काम पाहिले आहे. त्यांची टीम उत्तम आहे, राष्ट्रवादी काँग्रेस कायम त्यांच्या पाठीशी राहील, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचे स्वागत केले.

यावेळी पवार म्हणाले, मोहिते यांनी केंद्रात मंत्री असताना उत्तम काम केलेले पाहिले आहे. नवे कोणी काही चांगले करत असेल तर त्याचे कौतुक वरिष्ठ करतात. मी ही त्यावेळी त्यांचे केले. आता ते राष्ट्रवादीध्ये येत आहेत याचा आनंद आहे. पक्ष कायम त्यांच्या पाठीशी असेल, अशी खात्री त्यांना देतो.

मोहिते म्हणाले, शरद पवार हे ‘अनडाऊटेबल हिरो ऑफ इंडियन पॉलिटिक्स’ आहेत. आता माझे उर्वरित आयुष्य त्यांच्यासह काढणार आहे. विदर्भात शिवसेनेचा पहिला खासदार होतो. काम करण्याची उमेद आहे. इथेही चांगले काम करून दाखवणार आहे, असा शब्द देतो.

शिवसेना पक्षाकडून सुबोध मोहिते हे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले होते. मात्र, पुढे त्यांना लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये यश मिळविता आले नाही.

मोहिते हे मागील काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. अखेर पुन्हा एकदा राजकीय कारकीर्द सुरुवात करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

मोहिते यांचा आतापर्यंत शिवसेना, भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास राहिलाय. भाजप नेते नारायण राणे यांच्यासोबत मोहिते यांनी शिवसेनेला पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत रामराम ठोकला होता.