टिओडी मराठी, मुंबई, दि. 20 मे 2021 – देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक बाजूंनी टीका होत आहे. भाजपचेच काही नेते म्हणताहेत नरेंद्र मोदींचा राजीनामा घेऊन नितीन गडकरींना पंतप्रधान करा, अशी मागणी केली जातेय असे असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले.
नरेंद्र मोदींना हटवून नितीन गडकरी यांना पंतप्रधान करायचे, अशी चर्चा भाजपमध्ये सुरूय. पंतप्रधानपदी महाराष्ट्राचा माणूस विराजमान होत आहे, याचा आम्हाला आनंद असल्याचेही नाना म्हणाले.
लसनिर्मितीसाठी नितीन गडकरी यांनी दिलेल्या सल्ल्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, नितीन गडकरींचे मोदींसमोर चालते की नाही ठाऊक नाही. पण, आम्हाला वाटते की नितीन गडकरी हे देशाचे पंतप्रधान असायला हवेत. अनेक कोटी लोक देशात मरत आहेत. पण, याचं नरेंद्र मोदींना सोयरसूतक नाही.
पुढे नाना पटोले म्हणाले, लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करत आहेत. याचाच अर्थ मोदी अपयशी ठरले आहेत, हे आता भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे.
भाजपचे काही नेते नरेंद्र मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे, अशी मागणी करत आहेत. आमचा चंद्रकांत पाटील यांच्या मागणीला पाठिंबा आहे. त्यांनी नरेंद्र मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे? आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल?, असा टोला देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हाणला.
शेतकरी कोरोनाच्या संकटाने पिचला आहे. त्याला आधार देण्याऐवजी खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून त्यांच्यावर आणखी अन्याय केला आहे. तीन काळे कृषी कायदे आणून नरेंद्र मोदी सरकारने शेतक-यांना बड्या उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा विडा उचललाय. रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली दीडपट वाढ हे त्या दृष्टीनेच टाकलेले पाऊल आहे. दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करणा-या मोदींनी हमीभावाऐवजी शेतक-यांना येणारा उत्पादन खर्च दीडपट वाढवला आहे, असे देखील नाना पटोले म्हणाले.
अगोदर जनतेचे कंबरडे पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे मोडले आहे. यात रासायनिक खतांच्या दरवाढीचा बोजा शेतक-यांवर टाकला आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केल्याचा गाजावाजा करून दुस-या बाजूला खतांच्या किंमती वाढवून प्रत्यक्षात शेतक-यांची लूट करत उद्योगपती मित्रांची घरे भरण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.