TOD Marathi

मुंबई :

शिवसेनेला (Shivsena) सत्ता गेल्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ठाण्यातील माजी 66 नगरसेवक (Thane Shivsena Corporator) हे  शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यामुळे ठाण्यामध्ये शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. ठाण्यातील माजी महापौर नरेश मस्के यांच्यासह या सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. (Shivsena Thane News)

बंडखोरीनंतर ठाण्यातील अनेक नगरसेवक आणि समर्थक एकनाथ शिंदे यांना जाहीर समर्थन दाखवत होते. तसेच आपण शिंदे यांच्या पाठिशी उभे असल्याचे जाहीरपणे सांगतही होते. त्यानंतर आता ठाण्यातील माजी 66 नगरसेवकांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे हा शिवसेनेचा गड मानला जातो. गेली अनेक वर्षे ठाण्यामध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. मात्र आता याच पक्षातील माजी 66 नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

या बंडानंतर आता शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांसमोर हे गड राखण्याच मोठं आव्हान असणार आहे. कारण ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची वनमॅन आर्मी अशी ओळख होती. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यात शिवसेनेचा नवा चेहरा कोण असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ठाणे महापालिकेत (Thane Municipal Corporation) शिवसेनेचे 67 नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 34, भाजपचे 23, काँग्रेसचे 3 आणि एमआयएमचे 2 नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेचा कार्यकाळ संपलेला आहे. सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढच्या काही महिन्यात ठाणे महापालिकेची निवडणूक होईल. त्याआधीच शिवसेनेच्या 66 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना आपला गड राखू शकणार का? हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.