एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह थेट सूरत गाठलं. आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे सध्या सूरत येथील मेरिडियन हॉटेल या ठिकाणी आहेत. याठिकाणी त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार देखील उपस्थित असल्याची माहिती आहे. तर आणखी काही आमदार मुंबईतून सुरतला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आणि सध्या या आमदारांना मुंबईतच रोखून धरलं आहे. (Shivsena leader Eknath Shinde in Gujrat)
एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील राजकीय वजन आणि आमदारांशी असलेले संबंध पाहतात ते पक्षातील मोठा गट फोडू शकतात. एकनाथ शिंदे सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या गटातील अन्य शिवसेना आमदार सूरतला जाण्याच्या तयारीत होते. यामध्ये मंत्री दादा भुसे, संजय राठोड, संतोष बांगर आणि अंबादास दानवे (Dada Bhuse, Sanjay Rathod, Santosh Bangar, Ambadas Danve) असल्याची चर्चा आहे. हे सर्वजण सुरतला जाऊन एकनाथ शिंदे यांना भेटणार होते. हे सर्व आमदार सकाळपासून नॉट रिचेबल होते. मात्र, यापैकी काही आमदार मुंबईतील सेंट रेगिस हॉटेलमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती शिवसेनेला लागली. त्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी वेगाने सूत्रे हलवली.
शिंदे यांच्यासोबत जाऊ शकणारे 3 आमदार सेंट रेगिसमध्ये असल्याचे समजताच शिवसैनिक आणि काही आमदार तातडीने याठिकाणी दाखल झाले. त्यानंतर आमदार सुनील शिंदे यांनी या तिन्ही आमदारांना आपल्या गाडीत बसवले. या गाडीच्या अवतीभवती सचिन अहिर आणि सुनील प्रभू यांच्या गाड्या होत्या. कडेकोट बंदोबस्तामध्ये या तिन्ही आमदारांना वर्षा बंगल्यावरील बैठकीसाठी नेण्यात आले. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना त्यावेळीही शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना हुडकून काढण्याची भूमिका चोखपणे पार पडली होती. आतादेखील एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाऊ शकणाऱ्या आमदारांना रोखण्यासाठी शिवसेनेकडून वेगवान हालचाली सुरु आहेत.