TOD Marathi

मुंबई:

जून महिन्यात राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली होती, त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी झाल्या होत्या. संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. विविध पक्षांच्या नेत्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या या भूमिकेवर भाष्य केलं होतं मात्र कोणत्याही पक्षाने त्यांना समर्थन करण्याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली नव्हती. यामुळे काहीसा पेच निर्माण झाला होता. राज्यसभेतील सहाव्या जागेवरील संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरुन निर्माण झालेला पेच आता संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत.

संभाजीराजे यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. संभाजीराजे यांचा मुक्काम सध्या मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आहे. काहीवेळापूर्वीच शिवसेनेचे अनिल देसाई, उदय सामंत आणि मिलिंद नार्वेकर या तीन नेत्यांचे शिष्टमंडळ संभाजीराजे यांच्या भेटीसाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहे.

राज्यसभेवर निवडून जायचे असेल तर संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. अन्यथा आम्ही सहाव्या जागेवर आमचा उमेदवार रिंगणात उतरवू, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. मात्र, संभाजीराजे यांनी,’मला शिवसेना नको तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करा’, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, याच फॉर्म्युलावर शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात समझोता झाल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच यासंदर्भात घोषणा होऊ शकते.