TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 25 मे 2021 – कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. कडक निर्बंधमुळे अनेकांचे हाल होत आहेत. हातावरच पोट असणाऱ्यांचे जेवणाचे हाल झाले आहेत. त्यामुळे अशा गोरगरीब आणि गरजूंना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जातोय. मात्र, शिवसेनेच्या एका नगरसेवकाने दारुच्या बाटल्यांचे वाटपचा कार्यक्रम केला. या नगरसेवकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिपक वेतकर असे या नगरसेवकाचे नाव आहे.

अनेकांनी या नगरसेवकाची खिल्ली उडवली असून असा नगरसेवक आपल्या मतदारसंघात असावा, अशीही उपहासात्मक इच्छा व्यक्त केली जात आहे. अनेकांनी थेट टीका करुन परिस्थितीचं गांभीर्य नाही, असं म्हटलंय.

देशात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने लोकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे, अनेक सामाजिक संघटना, विविध राजकिय पक्षातील कार्यकर्त्यांनी गरजूंना मदतीचा हात दिलाय. असे असताना ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या एका नगरसेवकाने दारू वाटप केल्याने सोशल मीडियासह सर्वच स्तरातून मोठी टीका होतेय. आमदार निरंजन डावखरे यांनीही ट्विटरवरुन या उपक्रमावर टीका केली.

ते फोटो मागील वर्षीचे :
सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो हे मागील वर्षीचे आहेत. आपण विडंबन करायला गेलो मात्र, विटंबना झाली. आता एक वर्षानंतर हे प्रकरण पुढे आणून माझी बदनामी केली जातेय, अशी प्रतिक्रिया नगरसेवक दीपक वेतकर यांनी दिली आहे.

शिवसेना आमदाराच्या कार्यालयामध्ये दारू वाटप म्हणजे आनंद दिघेसाहेबांच्या विचारांना तिलांजली, असे ट्विट निरंजन डावखरे यांनी केलं आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील वागळे परिसरातील दिपक वेतकर या नगरसेवकाने शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांच्या कार्यालयातच हा दारू वाटपचा कार्यक्रम केला.

याच परिसरात राहणारे समाजसेवक प्रकाश सुर्वे यांनी याबाबत थेट ठाणे मनपा आयुक्त, ठाणे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली आहे. या नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केलीय.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. मात्र, त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकाने प्रशासनाच्या कामावर पाणी फिरवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे, या नगरसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.