TOD Marathi

भारतीय जनता पक्षानं (BJP) इतिहास संशोधन मंडळाची नव्यानं स्थापना केलीय का? असा प्रश्न खासदार संजय राऊत (Sanjay Raut on controversial statement of Prasad Lad) यांनी केला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLC Prasad Lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याची यांची लायकी नसल्याचे ते म्हणाले. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे. आज ते मुंबईकडे रवाना होणार आहेत, त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कर्नाटकच्या आरेला कारेनं उत्तर देऊ, असे वक्तव्य भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली, कर्नाटक महाराष्ट्रात घुसलंय, तुम्ही त्यांच्या ‘आरे’ला ‘कारे’ कधी करणार? असा सवाल राऊतांनी यावेळी केला. आता आरेला कारे करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षांची आहे. तुम्हाला उद्यापर्यंत दिसेल विरोधी पक्ष काय करणार, असेही ते म्हणाले. दरम्यान त्यांनी राज्य सरकारवर देखील जोरदार टीका केली.

महाराष्ट्राची जनता ही ताकद आहे. उदयनराजे भोसले असतील किंवा संभाजीराजे छत्रपती असतील ते आपापल्या पद्धतीनं जागरुकता निर्माण करत आहेत. विरोधी पक्षसुद्धा लवकरच त्यासंदर्भात आपली भूमिका जाहीर करेल. (Opposition will make their role clear soon) उद्या किंवा परवा याबाबत आम्ही बोलू असेही राऊत यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत भाजपचे लोकं जी अभद्र भाषा वापरतात, ते लोक शिवसेनेच्या बाबतीतही अभद्र बोलू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना यांचं एक नातं आहे. त्याच्यामुळं जे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचं बोलतात ते आम्हाला काय सोडणार असेही संजय राऊत म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते प्रसाद लाड?

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेलं आहे. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतल्याचे प्रसाद लाड म्हणाले. कोकण महोत्सवाच्या निमित्तानं प्रसाद लाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेते आमदार प्रविण दरेकर देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधकांनी लाड यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.