टिओडी मराठी, दि. 25 ऑगस्ट 2021 – भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेका विरोधात आक्रमक झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरला म्हणून राणे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर नारायण राणे यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, यावर वाद निवळला असे वाटत होते त्याच वेळी शिवसेना पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्या घरावर हल्ला करण्यात आला.
काल रात्री उशिरा काही अज्ञातांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या घरावर काचेच्या बाटल्या फेकून हल्ला केला आणि तेथून पळ काढला. खासदार विनायक राऊत यांचे मालवण तालुक्यातील तळेगाव येथे घर आहे या घरामध्ये विनायक राऊत यांचे निकटवर्ती राहत आहेत. ही घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिक मालवण तालुक्यातील तळगाव येथे दाखल झाले याप्रकरणी खासदार विनायक राऊत यांच्या नातेवाईकांनी मालवण तालुक्यातील कट्टा पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात तक्रार दाखल केली आहे.
भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर करण्यात आलेले कारवाईमुळे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.तर दुसरीकडे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते हे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपशब्द वापरल्याबद्दल नारायण राणे यांचा ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने निषेध करत आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना हे कधीकाळी एकत्र असणारे पक्ष आता विरोधात ठाकले असल्याचे दिसत आहेत.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या जळगाव येथील घरावर केलेल्या हल्ला हा कोणत्या कारणातून करण्यात आला आहे? आणि का केला आहे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे मात्र सध्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणानुसार हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी तर केला नाही ना असाही प्रश्न उपस्थित होत आहे.