TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 मे 2021 – सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत काल सकाळी अंतिम सुनावणी झाली, यावेळी महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर मराठा आरक्षण रद्द झाल्याबाबत अनेक नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर सडकून टीका केली.त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत आहेत. राष्ट्रवादीच्या काही लोकांनी याचिका दाखल केल्या होत्या, असा पलटवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले,’ मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांनी यात राजकारण करू नये. महाराष्ट्र सरकारला अधिकार नसल्याचे सर्वोच्च न्यायालय सांगत आहे. आम्ही हा कायदा मंजूर करण्यासाठी राष्ट्रपतींकडे जाऊ. विरोधी पक्ष नेत्यांनी आमच्यासोबत यावं, त्यांनी नेतृत्व करावं.’

तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, ‘भाजपचे चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अजित पवार या सर्वांना मराठा आरक्षण हवंय. जो मार्ग माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला होता, त्याच मार्गावर हे सरकार चालल होतं, त्याच मार्गाने पुढील काम चालू आहे.’ असं म्हणत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर प्रतिउत्तर दिले आहे.