TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 मे 2021 – महाराष्ट्रातील दहशतवादी विरोधी पथकाने (महाराष्ट्र एटीएस) आज धडक कारवाई केली आहे. महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील नागपाडा येथून दोघांना अटक केली. या दोघांकडे सुमारे 7 किलो 100 ग्रॅम युरेनियम आढळलं आहे. या युरेनियमची किंमत सुमारे 21 कोटी 30 लाख रुपये इतकी आहे. अणू ऊर्जा कायदा, 1962 अंतर्गत या दोघांनाही अटक केली आहे. याबाबत वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

जिगर पांड्या (रा. ठाणे) आणि अबू ताहीर (रा. मानखुर्द) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युरेनियम खरेदी करणाऱ्यासाठी कोणी तयार होतं का? याचा शोध दोन्ही आरोपी घेत असताना एटीएसने त्यांच्यावर छापा टाकला. आणि 7 किलो युरेनियम जप्त केले. या युरेनियमची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे २१ कोटी रुपये इतकी आहे. हे युरेनियम भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरकडे चाचणीसाठी पाठविण्यात आले होते, यात हे युरेनियम उच्च दर्जाचे असल्याचे उघड झाले.

जिगर हा युरेनियम विक्रीसाठी नागपाड्याला येणार आहे, अशी खबर एटीएसला मिळाली होती. यानुसार एटीएसने सापळा रचला आणि जिगरला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अबू ताहीरने हे युरेनियम दिले आहे, असे सांगितले.

एटीएसकडून या दोघांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात युरेनियम कोठून आणि कसा आला? याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.