TOD Marathi

मुंबई: आगामी नवरात्री उत्सवा दरम्यान महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने २ पाकिस्तानी नागरिकांसह एकूण सहा दहशतवाद्यांना काही दिवसांपूर्वीच अटक केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई एटीएस ने या बॉम्ब स्फोटाचं प्लॅनिंग करणाऱ्या मुन्ना भाईला मुंबई येथील मुंब्रा भागातून अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकत्रितपणे दहशतवादी मॉड्यूल संबंधित काल, शनिवारी जोगेश्वरी येथून संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी मुंबईत हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या एका आरोपीला मुंब्रामधून एटीएसने अटक केली आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव इमरान उर्फ मुन्ना भाई असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई एटीएसने झाकीर हुसैन शेख याला अटक केली होती. झाकीरच्या चौकशीत आणखी एकाचं नाव पुढे आलं. ज्यानंतर मुंब्रा परिसरात ATS ने छापेमारी केली. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी ट्रेनमध्ये गॅस हल्ला करण्याचं प्लॅनिंग रचत होते. या अलर्टनंतर जीआरपीने मुंबईच्या सर्व मोठ्या रेल्वे स्टेशनवर सुरक्षा व्यवस्था वाढवली. तर स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त इतर सर्व गेट्स बंद करण्यात आले. त्यात एटीएसनं इमरान उर्फ मुन्नाभाईला अटक करुन कोर्टात हजर केले आहे.