TOD Marathi

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या (State assembly) पहिल्या दिवसापासून विधिमंडळाच्या आवारात महाविकास आघाडीकडून होणारी जोरदार घोषणाबाजी सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखीचा विषय झाला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सोमवारी सभागृहात वापरलेल्या खास ‘अस्त्रामुळे’ धनंजय मुंडे ‘घायाळ’ झाले आहेत. त्यामुळे की काय मंगळवारी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) विधिमंडळाबाहेर उभे राहून नेहमीप्रमाणे घोषणाबाजी करताना दिसले नाहीत.

दररोज सभागृहाच्या बाहेर कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते. ज्यात राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे हे सर्वात पुढे असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सभागृहात बोलताना धनंजय मुंडे यांना निशाणा लगावला होता. विरोधकांकडे बोलण्यासाठी दोन शब्द सोडले तर कोणताही मुद्दा नाही. पण धनंजय मुंडे हे कित्येक वर्षाचा शिवसैनिक आहेत, असं बेंबीच्या देठापासून ओरडतात.. तुमचा इतिहास आम्हाला माहित आहे. फडणवीसांनीच तुमच्यावर दया, ‘करुणा’ दाखवलीय, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडेंवर सभागृहात जोरदार फटकेबाजी केली होती. हा घाव धनंजय मुंडे यांच्या वर्मी लागल्याची चर्चा आहे. मात्र, धनंजय मुंडे नियमित कामकाजासाठी सभागृहात उपस्थित होते.

मंगळवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जेव्हा घोषणाबाजी झाली, त्यातून धनंजय मुंडे हे गायब दिसले. या घोषणाबाजीसाठी शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षाचे आमदार उपस्थित होते. मात्र घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडणारे धनंजय मुंडे यावेळी दिसले नाही. धनंजय मुंडे यांना येण्यासाठी उशिर झाला किंवा जाणीवपूर्वक त्यांनी येणं टाळलं, किंवा मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यामुळे धनंजय मुंडेंच्या बोलण्यातली हवा गेली असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. करुणा शर्मा यांनी सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती.

करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी सोमवारी विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. यावेळी करुणा शर्मा यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. माझ्या आईप्रमाणे मला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे, असे त्यांनी म्हटले. करुणा शर्मा यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच करुणा शर्मा यांच्यावर आत्महत्येसाठी कोण दबाव आणत आहे, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत माझ्यावर दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे, ते रद्द करावेत, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली होती.