पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत आज पुण्यात सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांनी मुंबई येथे गुढीपाडवा मेळाव्यात भोंग्यावर घेतलेली भूमिका पुढे ठाणे येथे झालेल्या उत्तरसभेत आणि औरंगाबादेतही कायम ठेवली. त्यांच्या या भूमिकेमुळे काही ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिले. त्यापैकी नाराज झालेले काही मनसैनिक संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज पुण्यात शिवबंधन बांधणार असल्याचे समजते.
मुंबईसह मरावाड्यातील ३५ मनसैनिकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पुण्यातही राजीनामे दिल्या गेले. सुरुवातीला मनसेच्या वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शेहबाज पंजाबी यांनी राजीनामा देत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पंजाबी आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं कळतय. आज संध्याकाळी संजय राऊत यांच्या उपस्थितीत ते शिवबंधन बांधणार असल्याचं कळतंय. पंजाबी यांच्यासह मनसेतून बाहेर पडलेले आणखी 10 ते 12 जण त्यांच्यासोबत पक्षप्रवेश करणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत भोंग्यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली, अनेक नेत्यांनी त्यांची त्यांची मतं मांडलेली आहेत आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पुणे येथे होऊ घातलेल्या सभेत संजय राऊत काय बोलतात याकडे सर्वांचच लक्ष लागलेलं आहे.