TOD Marathi

मुंबई :  तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट लिलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाल्या. डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी देखील केलेली आहे. लिलावती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी त्यांची भेट घेतली. आमदार रवी राणा यांचीही तळोजा कारागृहातून थोड्याच वेळात सुटका होईल.

मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याच्या अट्टाहासामुळे तुरुंगात जाण्याची वेळ आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची अखेर 12 दिवसांनी सुटका झाली आहे. मात्र कोठडीतील 12 दिवसांच्या वास्तव्यामुळे नवनीत राणा यांच्या अनेक शारीरिक व्याधी उफाळून आल्या आहेत. त्यामुळे तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट लीलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाल्या आणि रुग्णालयात दाखलही झाल्यात.

राणा कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांना रक्तदाब, मणक्याचे दुखणे आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवत आहे. काल जे.जे. रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती अद्याप सुधारली नसल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले आहे. थोड्याच वेळात नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांचीही तळोजा कारागृहातून सुटका होणार आहे. त्यानंतर रवी राणा हे देखील थेट लिलावती रुग्णालयात येतील.

तुरुंगात असताना नवनीत राणा यांनी आपल्याला योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्षाकंडे तक्रारही केली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने यासंदर्भात राज्य सरकारकडून अहवाल मागवला होता.

खासदार नवनीत राणा यांना सुटका झाल्यानंतर अमरावतीत त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केल्याचेही चित्र बघायला मिळाले आहेत.