TOD Marathi

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर अनेक दिवस राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. फौजिया खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी आमदार विद्या चव्हाण यांची नियुक्ती महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खा. डॉ. फौजिया खान यांनी आज विद्या चव्हाण यांना नियुक्ती पत्र दिले. विशेष म्हणजे महिला काँग्रेसच्या विभागवार अध्यक्षांची देखील या प्रसंगी नियुक्ती करण्यात आल्याचे डॉ. फौजिया खान यांनी सांगितले. महिला संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी विद्या चव्हाण जोमाने काम करतील, असा विश्वासही फौजिया खान यांनी व्यक्त केला.

विद्या चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार म्हणून देखील काम केलेलं आहे. त्याबरोबरच प्रवक्ता म्हणून पक्षाची बाजू त्यांनी माध्यमांमध्ये कायम उचलून धरलेली आहे. पक्षाने ही संधी दिल्याबद्दल विद्या चव्हाण यांनी पक्षाचे तसेच पक्षातील प्रमुख नेत्यांचे आभार व्यक्त केले आहेत.