TOD Marathi

सध्या राजकारणात काही लोकांना घमेंड आली आहे. राज्यसभेची एक जागा जिंकली म्हणजे आपण संपूर्ण महाराष्ट्र आणि जग जिंकले असे त्यांना वाटत आहे. आमच्या राजकीय विरोधकांना मी एवढंच सांगू इच्छितो की, ‘तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है’, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर हल्ला चढवला. शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापदिनानिमित्त वेस्ट इन हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. (Shivsena Foundation Day)

यावेळी संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पाडल्यामुळे आनंदात असलेल्या भाजपचा (BJP) जोरदार समाचार घेतला. नुकत्याच राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या. अशा निवडणुकांमध्ये एखाद जागा इकडे-तिकडे होत असते. पण राज्यसभेची एक जागा जिंकली म्हणजे आपण महाराष्ट्र जिंकला किंवा जग जिंकले आहे, अशा थाटात वावरु नका. तुमची राजकीय घमेंड ही चार दिवसांची असेल, पण शिवसेनेची ‘बादशाही’ ही खानदानी आहे. राज्यसभा निवडणुकीत काहीही निकाल लागलेला असला तरी या महाराष्ट्राची सूत्रे ही शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडेच असतील, असे संजय राऊत यांनी म्हटले.

यावेळी संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेवरही जोरदार टीकास्त्र सोडले. केंद्राच्या अग्निपथ योजनेमुळे संपूर्ण देश पेटला आहे. केंद्र सरकार आता कंत्राटी पद्धतीने सैन्याची भरती करणार आहे. जगाच्या पाठीवर असा मूर्ख निर्णय कोणीही घेतला नसेल. वेड्या असलेल्या तुघलक मोहम्मदनेही असा निर्णय घेतला नसता. देशाचे रक्षण कोणी करायचे, हेच केंद्र सरकारला कळत नाही. ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैन्य नाही. अग्निपथ योजनेमुळे आज संपूर्ण देश पेटला असताना महाराष्ट्र शांत आहे. कारण, या राज्याचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात स्थैर्य राहील, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

‘मिस्टर फडणवीस…’

या कार्यक्रमात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. (Sanjay Raut criticized Devendra Fadnavis) राज्य कसे चालवायचे असते, हे महाराष्ट्रात येऊन पाहावे. मिस्टर फडणवीस नुसती कट-कारस्थानं करून राज्य चालवता येत नाही. हे राज्य सगळ्यांना एकत्र घेऊन चालवले पाहिजे. ती क्षमता केवळ शिवसेनेच्या नेतृत्त्वाकडेच आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.