TOD Marathi

मुंबई: सध्या माध्यमांवर फक्त आर्यन खान आणि त्याच्या प्रकरणावरून रंगत असलेलं राजकारण बघायला मिळत आहे. आर्यन खानच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. मात्र या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. आर्यन खान याच्यावरील कारवाई टाळण्यासाठी २५ कोटींची मागणी करून ८ कोटी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना दिले जाणार असल्याचा धक्कादायक खुलासा पंच प्रभाकर साईलने केला आहे.

मात्र हे सर्व आरोप एनसीबीने फेटाळून लावले आहेत. त्याच सोबत समीर वानखेडे यांनी देखील या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. एनसीबीने पत्राद्वारे सांगितले की, प्रभाकर साईल हा या प्रकरणातला साक्षीदार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून असे बोलणे योग्य नाही. त्याला जर या प्रकरणाची आणखी काही माहिती असेल तर न्यायालयात द्यावी, असा खुलासा एनसीबीचे डीडीजी अशोक जैन यांनी केला आहे.

प्रभाकर साईल हा आरोपी केपी गोसावीचा अंगरक्षक म्हणून काम करायचा. त्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार गोसावीने २५ कोटींची खंडणी शाहरुख खानकडे केली होती, त्यातील ८ कोटी हे समीर वानखेडे यांना दिले जाणार होते. मात्र या आरोपांवर समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण देत हे सर्व आरोप खोटे असून याला कुठलेच तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे.