मुंबई:
राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडला. आमच्यात राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत सर्व चर्चा झाली होती. सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तबही झाले होते, त्या संदर्भात एक ड्राफ्ट तयार करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द मोडला. या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटत आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती बोलत होते. उद्धव ठाकरे आणि माझ्यात काय संभाषण झाले, हे मला जाहीर करायचं नव्हतं, पण मला आज बोलावे लागतेय. मी सांगतोय त्यापैकी एकही शब्द खोटा असेल तर मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवछत्रपतींच्या कोणत्याही स्मारकावर यायला तयार आहे. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून उद्धव ठाकरे यांनी सांगावे की, मी खोटं बोलत आहे, असे आव्हान संभाजीराजे यांनी दिले. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचेही जाहीर केले. खासदारकी नव्हे तर माझी जनता माझ्यासाठी महत्त्वाची आहे असही संभाजीराजे छत्रपती यावेळी म्हणाले.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या प्रमाणात होऊ शकला नाही मात्र या वर्षी राज्यभरातून, देशभरातून, जगभरातून शिवभक्तांनी
6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळयानिमित्त किल्ले रायगडावर यावे असे आवाहनही त्यांनी केले.