TOD Marathi

सध्या राज्यात काही चित्रपटांच्या निर्मितीवरून मोठा वाद सुरू आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Sambhajiraje Chhatrapati on Har Har Mahadev and Vedat Marathe Veer Daudale Sat) या चित्रपटांच्या काही गोष्टींबद्दल आक्षेप घेतला आणि काही मागण्या देखील केल्या. यानंतर विविध लोकांकडून, राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून या संदर्भात प्रतिक्रिया देखील यायला लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेला पाठिंबाही दर्शवला. याच गोष्टीबद्दल आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Rohit Pawar on MNS role)

चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड करून महाराष्ट्राच्या अस्मितेची छेडछाड करण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्वतः छत्रपती संभाजी राजे आणि बांदल घराण्याने सांगूनही या अस्मितेला जुगारून खोटा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटांना ताकद देण्यासाठी मनसेची एवढी धडपड का सुरू आहे? असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘हर हर महादेव’ हा चित्रपट थांबवला नाही तर स्क्रीन बंद पाडू अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर सोमवारी रात्री ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड (NCP Leader Dr Jitendra Awhad) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा एक शो बंद पाडला होता. तो शो बंद पडल्यानंतर मनसेनेही भूमिका घेत एका ठिकाणी या चित्रपटाचा मोफत शो आयोजित केला होता. त्यामुळे या चित्रपटांना एका बाजूला विरोध होत असताना मनसे मात्र चित्रपटाचं समर्थन करताना दिसत आहे. यावर आमदार रोहित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

सोबतच भूतकाळात केलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेण्याची संधी प्रत्येकाला मिळत असते. आज तीच संधी चालून आली आहे. त्यामुळे खोटा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटांना विरोध करून मनसेने आपल्या भूतकाळातील चुका दुरुस्त कराव्यात, असं माझ्यासह अनेकांचं प्रामाणिक मत आहे, असेही रोहित पवार म्हणाले.