TOD Marathi

मुंबई | संभाजी भिडे यांनी अलिकडेच महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर सध्या टीका सुरू आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात मोर्चे आणि आंदोलनं केली जात आहेत. अशातच संभाजी भिडेंचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजू लागला आहे. विरोधी पक्षांमधील नेत्यांनी, प्रामुख्याने काँग्रेस आमदारांनी आज विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान, संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली. भिडेंच्या मुद्यावरून विधानसभेत विरोधकांनी मोठा गोंधळ घातला. परिणामी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याप्रकरणी बोलावं लागलं.

संभाजी भिडेंच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं. फडणवीस म्हणाले, अमरावतीतल्या भाषणाप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावरील कारवाईला सुरुवात झाली आहे. संभाजी भिडे गुरुजींना सीआरपीसीच्या कलम ४१ अ अंतर्गत नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. संभाजी भिडे यांनी नोटीस स्वीकारली आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी होईल.

हेही वाचा” …वेस्टइंडीज विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय दिग्गजाचा सवाल; म्हणाला…”

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, संभाजी भिडे यांच्या अमरावतीतल्या सभेचा व्हिडीओ उपलब्ध नाही. समाजमाध्यमांवर जे व्हिडीओ फिरत आहेत, त्याचे व्हॉईस सॅम्पल्स तपासले जातील आणि याप्रकरणी कारवाई होईल.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्याबद्दल विधानसभेत निवेदन देत असताना देवेंद्र फडणवीस हे सतत संभाजी भिडे गुरुजी असा उल्लेख करत होते. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. विरोधी बाकावरील आमदार फडणवीसांना म्हणाले, तुम्ही त्यांना गुरुजी का म्हणता? त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारण, आम्हाला ते गुरुजी वाटतात. तुम्हाला काय अडचण आहे? त्यांचं नाव भिडे गुरुजी आहे.