TOD Marathi

हेरवाडने देशाला दिशा दाखवली, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं अभिनंदन

कोल्हापुर: कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाडने देशाला दिशा दाखवली, शाहू महाराजांचा कृतीशील वारसा सांगितला, अशा शब्दात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हेरवाड ग्रामपंचायतीचं अभिनंदन केलं आहे. हेरवाड ग्रामपंचायतीने ‘विधवा प्रथा बंद’ करण्यासंबंधीचा ठराव पास केला आहे. ग्रामपंचायतीने उचललेल्या क्रांतिकारी पावलाचं राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातही कौतुक होत आहे.

महाराष्ट्रानं देशाला दिशा दाखवणारे विचार दिले आहेत. हेरवाड या गावाने महाराष्ट्रासह देशाला दिशा दाखवणारा निर्णय घेतला आहे. आगामी काळात हेरवाडचा आदर्श महाराष्ट्रभर घेतला जावा अशी अपेक्षा व्यक्त करते. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतिशील वारसा सांगणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीनं घेतलेल्या ‘विधवा प्रथा बंद’ या निर्णयाचं मी स्वागत करते, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र राज्याची देशभरात पुरोगामी राज्य अशी ओळख आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवणारे विचार दिले आहेत. अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्र राज्यातुन झाली आणि त्या योजना पुढे देशाने स्वीकारल्या. हेरवाड गावानं विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेत महाराष्ट्रासह देशाला दिशा दाखवणारा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीनं घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

आपल्या समाजात चाली रितीनुसार पतीच्या निधनानंतर अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे तसेच हातातील बांगड्या फोडल्या जातात. पायातील जोड़वी काढणे तसेच महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही, ही परिस्थिती आहे. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे महिलांच्या अधिकारांवर गदा येत आहे. म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या गावामध्ये तरी विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, या करीता विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. या संदर्भात गावामध्ये जनजागृती करणेत यावी. त्यास ही सभा मंजूरी देत आहे, असा ठराव मंजूर करण्यात आला.

हेरवाड ग्रामपंचयातीचे संरपंच सुरगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुक्ताबाई संजय पुजारी यांनी ठराव मांडला. तर, सुजाता केशव गुरव, यांनी अनुमोदन दिलं आहे.