TOD Marathi

शिवसेनेच्या वतीने डॉ. मनिषा कायंदे, किशोरी पेडणेकर लीलावती रुग्णालयात. ‘त्या’ व्हायरल फोटोसंबंधी प्रशासनाला विचारला जाब

मुंबई: खासदार नवनीत राणा यांना जामीन मिळाल्यानंतर त्या लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांचा एम आर आय काढतानाचा एक फोटो सोशल मीडियात आणि सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. यासंबंधी जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे एक शिष्टमंडळ लीलावती रुग्णालयात गेलं होतं. या शिष्टमंडळाने लीलावती रुग्णालय प्रशासनाची आज शिवसेनेने शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं.

शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, युवासेनेचे राहुल कनल यांच्यासह शिवसेनेचे काही प्रमुख पदाधिकारी यांनी लीलावती हॉस्पिटल गाठत नवनीत राणा यांच्या फोटोवरून आक्षेप घेत उपचाराचं शूटिंग कसं केलं? असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला विचारला.

यावेळी एम आर आय रूम पर्यंत कॅमेरा पोहोचलाच कसा? हे फोटो कुणी काढले? त्याठिकाणी शूटिंगची परवानगी कशी मिळाली? नवनीत राणा यांना स्पॉन्डिलायटिस असताना उशी का दिली? रुग्णासोबत एकालाच परवानगी असताना सोबत चार लोक कसे? नवनीत राणा यांचं एम आर आय काढताना डोकं वर केलेलं कसं दिसत आहे? सेलिब्रिटीसाठी काही वेगळा नियम आहे का? अशा प्रश्नांची सरबत्तीच शिवसेनेने लीलावती रुग्णालय प्रशासनावर केली. माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी सीसीटीवी फुटेजचा व्हिडिओही मला द्या अशी मागणी केली.

यावेळी या प्रश्नांची उत्तर देताना लीलावती रुग्णालय प्रशासनाने काही उत्तरे देण्याचा प्रयत्न केला खरा मात्र या सवाल-जवाबात काही वेळाने रुग्णालय प्रशासन निरुत्तर झाल्याचे पाहायला मिळालं.

आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी यावेळी लीलावती रुग्णालय प्रशासनाला एका निवेदन दिले. आणि याद्वारे विविध मुद्दे उपस्थित करत या संबंधीच्या प्रश्नांची उत्तर देण्याची मागणीही रुग्णालय प्रशासनाला केली.

या एकूण घटनेबद्दल सत्य न सांगितल्यास रुग्णालय प्रशासन अडचणीत येईल असा इशाराच शिवसेनेने या प्रसंगी दिला आणि राणांचा एम आर आय काढणाऱ्या चमूची उलट तपासणीच यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.