TOD Marathi

मुंबई :  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांची भूमी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड या छोट्या गावानं एक महत्वाचा विचार महाराष्ट्राला दिला आहे. या गावानं विधवा प्रथा बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. हा निर्णय आता राज्यपातळीवर राबविण्याची गरज आहे असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

आगामी ३१ मे या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने हेरवाडच्या धर्तीवर विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव केला तर या प्रथेला व्यापक स्तरावर रोखणे शक्य होइल.

या विषयाची सामाजिक जाणिवेची भूमिका लक्षात घेता ३१ मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावावी. तसेच हेरवाडच्या धर्तीवर विधवा प्रथा निर्मूलनाचा ठरावा मंजूर करावा, अशी विनंती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना सुप्रिया सुळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

हे प्रगतीकारक पाऊल टाकून महाराष्ट्राचा पुरोगामी वसा आणि वारसा जपुया. त्यांना समाजातील सर्व स्तरावर सन्मानाने सहभागी होण्याची आणि योगदान देण्याची संधी उपलब्ध करून देऊन भारतीय संविधानाची गौरवशाली परंपरा पुढे नेऊ अशी भावना देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.