TOD Marathi

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी सुरु होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी दोन दिवसांपूर्वी विधिमंडळ परिसरात रोहित पवार यांनी आंदोलन केलं. पण, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं. मात्र, एमआयडीसीला मिळणारी जमीन ही नीरव मोदीची असल्याचा दावा आमदार राम शिंदे यांनी विधानपरिषदेत केला आहे. यावर चौकशी केली जाईल, असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं.

“आतापर्यंत जामखेडची एमआयडीसी का होऊ शकली नाही? कर्जतच्या एमआयडीसीला कधी मंजूरी मिळणार? कोणत्या ठिकाणी ती केली जाणार?” असे सवालही राम शिंदे यांनी उपस्थित केले.

हेही वाचा” …“मी ऐकलंय की लाल डायरीत काँग्रेसचे….”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका”

“कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोड दरात गुंतवणूकदारांनी विकत घेतल्या आहेत. त्यांची नावे नीरव मोदी, मनिषा कासोले, नयन गणेश अग्रवाल, कमलेश शाह, पंकज विनोद खन्ना, गणेश अग्रवाल अशी आहेत. मग, ही एमआयडीसी गुंतवणूकदार, शेतकरी की बेरोजगारांसाठी करायची?” असा प्रश्न राम शिंदे यांनी विचारला.

यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं, “कर्जतला एमआयडीसी करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. पण, तिथे नीरव मोदीने जमीन घेतल्याचं समोर आलं आहे. हा नीरव मोदी लंडनला पळून गेलेला की स्थानिक आहे, याची माहिती घेतली जाईल. तसेच, सर्व नावांची चौकशी करण्यात येईल.”