TOD Marathi

राजस्थान | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या सीकरमधल्या रॅलीत लाल डायरीचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार चालवण्याच्या नावाखाली खोट्या गोष्टी करतं आहे. लूटालट सुरु आहे, त्याचंच ताजं उत्पादन आहे ती म्हणजे राजस्थानची लाल डायरी. असं म्हणतात की लाल डायरीत काँग्रेसचे काळे कारनामे लपलेले आहेत. काँग्रेसच्या बड्या-बड्या नेत्यांची बोलती लाल डायरीचं नाव काढल्यावर बंद होते. निवडणुकीत लाल डायरीमुळे काँग्रेसचा डबा गुल होणार आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

लोकशाहीमध्ये जेव्हा आपण सरकार चालवत असतो तेव्हा आपण काय कामं केली त्याचा हिशोब द्यावा लागतो. काँग्रेसकडे आहे का कुठला हिशोब? जे चार वर्षे झोपा काढत होते ते आता तुम्हाला कुठल्या कामाचा हिशोब देतील? राजस्थान सरकारने आपला प्रत्येक दिवस आपसात लढण्यात घालवला आहे. लोकांच्या प्रश्नांशी या सरकारला काही घेणंदेणं नाही.

हेही वाचा “ …राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाची दोन्ही गटांना नोटीस, तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश”

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले की राजस्थानमध्ये चांगले रस्ते तयार व्हावेत, राजस्थानचा विकास व्हावा म्हणून केंद्र सरकारने अनेकदा पैसे पाठवले. केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा १० वर्षात १ लाख कोटी रुपये देण्यात आले. तर आमचं सरकार आल्यानंतर मागच्या नऊ वर्षात भाजपने ४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी दिला.

आज गरीब घरातला मुलगाही डॉक्टर, इंजिनिर झाला पाहिजे याची खात्री आम्ही सरकार म्हणून देतो आहोत. गरीब कल्याणासाठी दिल्लीत बसलेला हा प्रधानसेवक तुमच्यासाठी समर्पण भावाने काम करतो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.