TOD Marathi

मध्य प्रदेश | मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर-चंबळचा पट्टा केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा बालेकिल्ला असला तरी, गेल्या दोन महिन्यांमध्ये त्यांच्या चार खंद्या पाठिराख्यांनी पाठ फिरवली असून २०१८ च्या विधानसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती २०२३ मध्ये करून दाखवण्याचा त्यांच्यावरील दबाव वाढू लागला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांचे उजवा हात मानले जाणारे समंदर पटेल यांनी शक्तिप्रदर्शन करत काँग्रेसमध्ये घरवापसी केली. पटेल हजारभर गाड्यांचा ताफा घेऊन आपल्या समर्थकांसह काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्या भेटीला गेले, त्यांच्या उपस्थितीत पटेलांनी तीन वर्षांनंतर पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मार्च २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदेंनी वीसहून अधिक समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामध्ये समंदर पटेलही होते. आता मात्र मध्य प्रदेशमधील शिवराजसिंह चौहान यांचे सरकार भ्रष्ट असल्याचा आरोप पटेल करत आहेत.

हेही वाचा ” …शिंदेंच्या सांगण्याने कोश्यारींना मविआच्या १२ आमदारांची यादी परत पाठवली, राज्य सरकारची कबुली”

पटेलांच्या आधी ज्योतिरादित्यांचे समर्थक बैजनाथसिंह यादव, रघुराज धाकड, राकेश गुप्ता या शिवपुरी जिल्ह्याच्या अर्थकारणावर पकड असलेल्या नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली व ते काँग्रेसमध्ये गेले. गेल्या आठवड्यामध्ये भाजपने मध्य प्रदेशातील ३९ मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली, त्यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक रणवीर जाटव यांना डावलण्यात आले. ज्योतिरादित्यांचे समर्थक नेते त्यांना सोडून जात आहेत वा त्यांना भाजपकडून उमेदवारी नाकारली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळण्याची खात्री नसल्याने ज्योतिरादित्यांचे समर्थक काँग्रेसमध्ये परतत असल्याचे मानले जाते.

ग्वाल्हेर-चंबळ खोऱ्यात विधानसभेचे ३४ मतदारसंघ आहेत. २०१८ मध्ये काँग्रेसमध्ये असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी २५ जागा जिंकून दिल्या होत्या. पाच वर्षांनंतर मोदी-शहांना ज्योतिरादित्यांकडून फेरयशाची अपेक्षा आहे. भाजपच्या नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वासही दाखवला असल्याचे दिसते. मध्य प्रदेशच्या दौऱ्याहून परत येताना पंतप्रधान मोदींनी ज्योतिरादित्यांना विमानात बसवून घेतले होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ग्वाल्हेर दौऱ्यात शिंदेंचे निवासस्थान असलेल्या ‘जय विलास पॅलेस’ला भेट दिली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील शिंदेंच्या या महालात जाऊन पाहूणचार घेतला होता. दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये शहा यांनी, ‘निवडणुकीनंतर मुख्यमंत्री निश्चित केला जाईल’, असे विधान करून ज्योतिरादित्य शिंदेंची उमेद वाढवली आहे. त्यामुळेच ऐन मोक्याच्या क्षणी पाठिराख्यांनी काँग्रेसमध्ये केलेला पुनर्प्रवेश ज्योतिरादित्यांसाठी त्रासदायक ठरू लागला आहे.