TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 17 मे 2021 – भारताची मध्यवर्ती बँक असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे. मात्र, यातील काही तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सिस्टीम अपडेट केले जाणार आहे, म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 23 मे रोजी काही तास नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर अर्थात NEFT सेवा बंद असणार आहे. याबाबतची महत्वपूर्ण सूचना आज आरबीआयने दिली आहे.

देशात डिजिटल बँकिंगचा वापर वाढला आहे. डिजिटल बँकिंगमुळे पैशाची देवाणघेवाण सोप्या पद्धतीने करता येत आहे. यामुळेच बँक खातेदार या सुविधेचा अधिक प्रमाणावर वापर करत आहेत.

एनईएफटीच्या माध्यमातून दोन लाखांपर्यंतचा व्यवहार केला जातोय. या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बँके खात्यात थेट पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, यासाठी दोन्ही बँक खातेधारकांकडे इंटरनेट बँकिंग सेवा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ६ जून २०१९ रोजी आरबीआयने NEFT सेवा निशुल्क केलीय. ही सुविधा पूर्वी सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत होती. मात्र, आता ही सुविधा २४ तास उपलब्ध असते.

जाणून घ्या, RBI ची महत्वपूर्ण सूचना :
एनईएफटी सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी रात्री १२ ते २३ मे रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे या वेळेत पैशांचा व्यवहार करता येणार नाही. सुमारे १४ तास ही सेवा बंद राहणार आहे. अपग्रेड दरम्यान बँक खातेधारकांना त्याचे अपडेट मिळतील, असे आरबीआयकडून सांगितले आहे.