TOD Marathi

मुंबई : शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात झालेल्या राड्यात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एंट्री घेतली आहे. नारायण राणे यांनी आज सकाळी सदा सरवणकरांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. प्रभादेवी भागात ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक यांच्यात राडा झाला होता. या पार्श्वभूमीवर राणे-सरवणकर भेटीकडे सर्वांचे डोळे लागले होते. महाराष्ट्रात राहायचंय-फिरायचंय ना? असा उघड इशाराच सरवणकरांच्या भेटीनंतर राणेंनी ठाकरेंना दिला आहे.

सदा सरवणकर माझे मित्र आहेत, काल जो प्रकार घडला, त्यानंतर त्यांची विचारपूस करण्याच्या हेतूने आलोय. तक्रार दिलेय त्याची पोलीस चौकशी करतील. फायरिंग झालेय असं म्हणता, तर आवाज आला का? असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला. सरवणकरांच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मातोश्रीच्या दुकानात बसून तक्रारींचं मार्केटिंग करण्याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नाही. पण असले हल्ले-बिल्ले करु नका, मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचंय फिरायचंय ना? परवानगी घ्यावी लागेल. पक्षाचा प्रश्न नाही, मित्र आहे म्हणून आलो. आमची युती आहे, युती धर्मानुसार एकमेकांच्या मागे दोघांची ताकद असतेच. ५० जण एकावर हल्ला करायला आले, त्यासाठी अजामीनपात्र कलम ३५४ लागतो, असंही राणेंनी सांगितलं.

आम्ही धांगडधिंग्याची दखल घेत नाही, नाहीतर त्यांचं चालणं फिरणं कठीण होईल. शिंदे गटच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतील, धनुष्यबाण चिन्हही त्यांनाच मिळणार, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.