मुंबई : राज्याच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट समोर आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं आहे. दुपारी साडे चार वाजता एकनाथ शिंदे गणपती दर्शनाच्या निमित्तानं राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. कालच भाजप नेते आशिष शेलार यांनी गणपती दर्शनाच्या निमित्तानं राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट दिली होती. यापूर्वी विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळेही राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. त्यामुळे ही भेट फक्त गणपती दर्शनापुरती मर्यादीत असेल की, त्यात नवी राजकीय समीकरण दडली आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
याआधी नितीन गडकरी, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येणार का असेही तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेने साथ सोडल्यानंतर मनसे आणि भाजप युती होणार अशीच राज्यात चर्चा होती. त्यातच गेल्या काही दिवसात भाजप आणि मनसे यांची जवळीक वाढली आहे.
त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही नवी समीकरणे जुळतात का याबद्दल चर्चा आहेत. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमेकांना पूरक भूमिका बघायला मिळतात. हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यापासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक वाढली आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकारणात शिंदे गट, भाजप अन् मनसेत युती होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.