TOD Marathi

मुंबई | राज्यात २०१४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार होतं. एक टर्म यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या या दोन्ही पक्षाच्या युतीचं २०१९ च्या निवडणुकीनंतर बिनसलं आणि युती तुटली. भाजपशी युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्री झाले. दरम्यान, शिवसेनेबरोबर सत्तेत असताना आपण उद्धव ठाकरेंसाठी अनेकदा प्रोटोकॉल तोडल्याचं वक्तव्य तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनेक खुलासे व दावे केले आहेत. “पाच वर्षे आम्ही सरकार चालवलं, अर्ध्या रात्री उद्धव ठाकरेंनी काही म्हटलं तरी त्याला मान होता, कधी त्यांना नाही म्हटलं नाही, मी मुख्यमंत्री आहे तर कधीच त्यांच्याकडे जाणार नाही, असं नव्हतं. मी स्वतः मातोश्रीवर जायचो, कुठेही मान-अपमान हे नाट्य मी केलं नाही,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा” …अजितदादांचा सख्खा पुतण्या अचानक शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण”

उद्धव ठाकरेंसाठी प्रोटोकॉल तोडल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “प्रोटोकॉलमध्ये पंतप्रधानांच्या आधी मुख्यमंत्री बोलतो, त्यांच्या आधी इतर सगळे बोलतात, पण अनेकदा मी प्रोटोकॉल तोडून माझं भाषण झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना भाषण करायला द्यायचो. एवढं सगळं करूनही तुमचं नाही पटलं, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर तुम्ही दुसऱ्यासोबत जाताय, हे तुम्ही हिंमतीने सांगितलं पाहिजे होतं,” असंही फडणवीस म्हणाले.

यावेळी अरविंद केजरीवाल व उद्धव ठाकरे यांच्यापैकी कोणते विरोधक सरळ आणि कर्तव्यदक्ष वाटतात, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी हे दोघेही आपल्याला जिलेबीसारखे सरळ वाटत असल्याचं म्हटलं.