TOD Marathi

मुंबई | अजित पवार यांनी अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड केल्याने राष्ट्रवादीत फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, शरद पवार यांनी लढण्याची भूमिका घेत नाशिकमधील येवल्यात जाहीर सभा घेत बंडखोरांना आव्हान दिलं. या पार्श्वभूमीवर दोघांमधील संघर्ष वाढला आहे. मात्र अशातच आज झालेली एक भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवार यांचे सख्खे पुतणे असलेल्या युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात पवार कुटुंब हे एकोप्यासाठी ओळखलं जातं. मात्र अजित पवार यांच्या बंडानंतर या कौटुंबिक एकोप्यालाही धक्का बसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता कौटुंबिक पातळीवर सौहार्याचं वातावरण कायम राहावं, यासाठीच्या प्रयत्नांना सुरुवात झाल्याचं दिसत आहे. युगेंद्र पवार हे राजकीयदृष्ट्या सक्रीय नसले तरीही बारामती शहरात ते विविध उपक्रमांच्या माध्यमातून काम करत असतात. तसंच शरद पवार हेदेखील युगेंद्र यांच्या विविध उपक्रमांना भेट देत त्यांना प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे एकीकडे अजित पवारांसोबत राजकीय संघर्ष सुरू असताना त्यांच्या पुतण्याने शरद पवारांची भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्क लढवले जात आहे.

हेही वाचा” …संजय शिरसाटांचं ‘त्या’ दाव्यावर प्रत्युत्तर; म्हणाले झिरवळांनी अपेक्षेपेक्षा जास्त बोलू नये”

युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. युगेंद्र यांच्या मातोश्री शर्मिला पवार या गेल्या अनेक वर्षांपासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण ते गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना पाहायला मिळतात.