TOD Marathi

बुलढाणा :

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील भारत जोडो यात्रेनं जवळपास १८०० किमीचा टप्पा पार केला आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमधील प्रवास पूर्ण करत भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचणार आहे. कर्नाटकनंतर दुसऱ्या भाजपशासीत राज्यात आणि हिंदी भाषिक पट्ट्यातील पहिलं राज्य मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करणार आहे. हिंदी भाषिक पट्ट्यात काँग्रेसला पुन्हा जनाधार मिळवण्यासाठी भारत जोडो यात्रेचा मध्य प्रदेशपासून सुरु होणारा प्रवास महत्त्वाचा ठरणार आहे. उद्या महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात दाखल होईल. भारत जोडो यात्रेचा हा टप्पा सुरु होत असताना प्रियांका गांधी देखील मैदानात उतरणार आहेत.

भारत जोडो यात्रेला दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात जो प्रतिसाद मिळाला आहे तो कायम राखणं हे आव्हान काँग्रेसपुढं असणार आहे. यासाठी काँग्रेसला प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळं प्रियांका गांधी राहुल गांधी यांना साथ देण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. बुधवारपासून पुढील चार दिवस प्रियांका गांधी भारत जोडो यात्रेत चालणार आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. मध्य प्रदेशात आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रा यशस्वी करणं काँग्रेससाठी खूप महत्त्वाचं आहे.

काँग्रेसनं गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावली होती. मात्र, ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या बंडामुळं तिथं भाजपला पुन्हा सत्तेत येता आलं. प्रदेशाध्यक्ष या नात्याने मध्य प्रदेश काँग्रेसची जबाबदारी कमलनाथ यांच्याकडे आहे. काँग्रेस कमलनाथ यांच्या चेहऱ्यावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मध्य प्रदेशात सत्ता मिळवली होती. मात्र, त्यावेळी देखील माळवा भागात काँग्रेसला यश मिळालं नव्हतं. त्याच भागातून भारत जोडो यात्रा जाणार आहे. माळवा भागात भाजपची ताकद आहे.

 

मध्य प्रदेशातील १३ दिवसांचा प्रवास संपवून भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये प्रवेश करणार आहे. राहुल गांधी उज्जैनमध्ये बाबा महाकालचे दर्शन घेणार आहेत. साधू संतांसोबत नर्मदा पूजा देखील ते करणार आहेत. इंदोरमध्ये ही यात्रा तीन दिवस असेल. मध्य प्रदेशमध्ये या यात्रेचा प्रवास हा ३८२ कि.मी. चा असेल.

 

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबरला सुरु झाली होती. कन्याकुमारी ते काश्मीर असं एकूण ३५७० किलोमीटरचं अंतर राहुल गांधी या यात्रेच्या निमित्तानं कापणार आहेत. सोनिया गांधी कर्नाटकमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या.तर प्रियांका गांधी मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.