पुणे :
पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघाताची देशभरात चर्चा झाली. (Navale bridge Pune accident) रविवारी या अपघातामध्ये एका कंटेनरने चक्क ४७ ते ४८ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात १३ जण गंभीर जखमी झाले. तर कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला होता. यानंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी अपघात झाल्याची माहिती आहे. आज पुन्हा झालेल्या अपघातात भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकला. या धडकेत २ चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले असून हा ट्रक कात्रजच्या दिशेने मुंबईकडे जात होता. रविवारी झालेल्या भीषण अपघातानंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे.
आज पुन्हा अपघात
महामार्गावर नुकत्याच झालेल्या अपघाताच्या ठिकाणी पुन्हा कंटेनरने पुढे चाललेल्या कारला धडक दिली. (Again accident took place on Navale bridge) माशांचे खाद्य घेऊन जाणाऱ्या या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. दरम्यान या धडकेमुळे कंटेनर दुभाजक तोडून दुसऱ्या लेन मध्ये घुसला. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या कारमधील कुटुंब कोल्हापूरहून लोणवळा येथे जात होते.
सातारहून पुण्याच्या दिशेने येणारा ट्रक कात्रजच्या नवीन बोगद्यातून नवले पुलाच्या दिशेने येत असताना या कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर समोरील वाहनांना उडवत पुढे गेला. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्याने वाहतुक बराच वेळ थांबवावी लागली. पुण्यातील नवले पुल हा अपघातांचं केंद्र बनला असून अनेक निष्पापांना इथे आपले प्राण गमवावे लागले आहेत. कारण आहे या ठिकाणी चुकलेली रस्त्याची रचना. तीव्र उतार आणि वळणे एकत्र झाल्याने पु्ण्यातील नवले पुलाचा भाग अपघातांसाठी हॉटस्पॉट बनला आहे.
नवले पुलावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होते. नवले पुलाचीओळख सध्या अपघाती पूल होताना दिसत आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. आजपर्यंत शेकडो लोकांना या अपघातांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. सतत होणाऱ्या या अपघातांकडे महामार्ग प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाल्याचे दिसत नसून अपघातांचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.