TOD Marathi

शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. सध्या उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत. तर दुसरीकडे शिंदे गट आणि भाजपा एकत्र येत युतीच्या रुपात राज्यात सत्तेत आहेत. दुसरीकडे वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाशी आघाडी करण्यास तयार असल्याची भूमिका घेतली आहे. याच कारणामुळे राज्यात आगामी काळात नवे सत्तासमीकरण उदयास येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. असे असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह येथे या दोघांची भेट होणार असल्याची माहिती आहे. सध्या राजगृहात प्रकाश आंबेडकर राहतात. आगामी काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट होणार आहे, असे म्हटले जात होते. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ बुधवारी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. या भेटीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणूक तसेच आगामी विधानसभा निवडणूक या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगामी काळात होऊ घातलेल्या महाालिका निवडणुका तसेच २०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसशी युती करण्यास तयार असल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्हाला उद्धव ठाकरे यांचे हिंदूत्व मान्य असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे गाटातील काही नेत्यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली होती. शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी ही चांगली बाब ठरेल, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली होती.