TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 19 ऑगस्ट 2021 – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती सभापती यांच्यासह 4 कर्मचाऱ्यांवर पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत त्यांना अटक केली आहे. यामागे खूप मोठा राजकीय हस्तक्षेप असून मोठे षडयंत्र आहे. यात अ‍ॅड. नितीन लांडगे यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी गुरुवारी (दि. 19) केला आहे. सत्य समोर यावे म्हणून प्रशासकीय यंत्रणेला भाजपकडून संपूर्णपणे सहकार्य करण्यात येणार आहे. यातून ‘दूध का दूध और पानी का पानी’ होईल असे आमदार लक्ष्मण जगताप म्हणालेत.

पिंपरी – चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयावर बुधवारी (दि.18) पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकला. यावेळी रोकड, कागदपत्रे ताब्यात घेऊन स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नितीन लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे आणि तीन कर्मचाऱ्यांची चौकशी केली.

पंचनामा, जबाब घेत सभापती आणि चार कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि प्रवक्ते अमोल थोरात यांनी पत्रकारांशी आज संवाद साधला.

यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, अतिशय खालच्या थराला जाऊन पिंपरी-चिंचवडमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय. अँटी करप्शन विभागाने कारवाई कोणत्या आधारावर केली?, हे अजून स्पष्ट झाले नाही. केवळ तक्रार केली म्हणून कारवाई केली, हे अपेक्षित नाही. कोणताही लेखी पुरावा नसताना एखादे कॉल रेकॉर्ड नसताना कोणत्या आधारावर कारवाई केली?.

अ‍ॅड. नितीन लांडगे अतिशय स्वच्छ आणि समाजसेवेचा वारसा असलेल्या परिवारातील व्यक्तिमत्व आहे, ते राजकारणात केवळ समाजसेवा म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून अशाप्रकराची कोणतीही गोष्ट होणे शक्य नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावर भाजपच्या अनेक नगरसेवकांनी सभापती म्हणून काम केलं आहे. या पदाचा मान वाढविण्याचे काम केलं आहे. स्थायी समिती सभापती पदावर काम करताना या शहरासाठी चांगले काय होईल? एवढाच विचार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे, असे असताना अशा प्रकारचे राजकारण करणे हे निंदनीय आहे.

अ‍ॅड. नितीन लांडगे आणि इतर चार कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवाईबाबत भाजपकडून पाठपुरावा करणार आहे. यामधून सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत अ‍ॅड. लांडगे यांच्या पाठीशी पक्ष उभा राहणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही सत्य समोर येईल, तोपर्यंत पाठपुरावा करा, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप करून षडयंत्र रचून अ‍ॅड. लांडगे यांना गोवण्याचा जो प्रयत्न झालाय, त्याचा पर्दाफाश भाजप करणार आहे असे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी सांगितले आहे.

त्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, अ‍ॅड. नितीन लांडगे हे स्वच्छ प्रतिमा असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांची स्वतःची इतकी मालमत्ता आहे. ते असं काहीही करणार नाही. भाजप पिंपरी-चिंचवड शहरात चांगल्या पद्धतीने काम करत आहे. नागरिकांच्या हिताच्या अनेक चांगल्या गोष्टी भाजपच्या सत्ता काळात महापालिकेने उपलब्ध केल्यात.

त्यामुळे आगामी काळात भाजपची सत्ता शहरात येणार आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे केवळ राजकीय हेतू ठेवून अँटी करप्शनची कारवाई व्हावी, या हेतूने संपूर्णपणे हा प्रकार रचला आहे. मात्र, सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही.

सत्य समोर यावे म्हणून प्रशासकीय यंत्रणेला भाजपकडून सहकार्य केले जाणार आहे. यातून लवकरच ‘दूध का दूध और पानी का पानी’ होईल, असेही आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले.