TOD Marathi

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आज पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी बैठक पार पडत आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. मात्र, आज चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन असल्याने अजित पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. एकीकडे अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार नसले तरी देखील अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील हे या बैठकीला उपस्थित राहिले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दिलीप वळसे पाटील हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती होती. मात्र स्वतः शरद पवार यांनी वळसे पाटील यांना राजीनामा देण्यापासून थांबवले तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे काम करण्यास देखील सांगितले. या चर्चांना स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी दुजोरा दिला आहे. आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “हा अतिशय वैयक्तिक प्रश्न आहे पण मला काम करायला सांगितलं हे खरं आहे”

हेही वाचा ” …“नरेंद्र मोदी देशाला धोकादायक, त्यांना…”, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य”

आज चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. या उद्घाटनाला अजित पवार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत अजित पवारांना तिथून निघता येणार नसल्याने अजित पवार वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.