TOD Marathi

सातारा | देशासह राज्यातील वातावरण बदलू लागले आहे. विश्वासू आणि सामान्य जनतेचा पक्ष म्हणून जनता काँग्रेसकडे पाहतेय. माढा मतदारसंघातील जनतेला माझे आवाहन आहे, तुम्ही ठाम राहा. पुढील खासदार हा काँग्रेस पक्षाचा असेल. भाजप खासदार निवडून आपण नुकसान करून घेतल्याची जाणीव इथल्या मतदारांना झाली आहे .असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

माढा लोकसभा मतदारसंघातील माण, खटाव व फलटण विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक दहिवडी येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, सातारा जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, सोलापूर जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह देशमुख, सुरेश चव्हाण, श्रीरंग चव्हाण, उदयसिंह पाटील, राजेंद्र शेलार, भानुदास माळी, अल्पना यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा ” …मला राजीनामा देण्यापासून पवारसाहेबांनी थांबवलं, राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट”

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजप जातीजातीमध्ये द्वेष निर्माण करते. कोणीतरी मनोहर भिडे येतो आणि वादग्रस्त वक्तव्य करून दंगली घडवितो. या देशात पुन्हा जर भाजपचे सरकार आले तर मोदी लोकशाही जिवंत ठेवणार नाहीत, असे स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी दहिवडी येथील सभेत मांडले.

७० वर्षात जेवढे कर्ज नव्हते, तेवढे कर्ज मोदी सरकारने काढले आहे. त्यामुळे देश आर्थिक संकटाकडे वाटचाल करतोय. संविधान वाचेल की नाही सांगता येणार नाही. भाजपला मतदान करून देशाचे आणि स्वतःचे नुकसान करून घेऊ नका, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

महाराष्ट्र राज्यातील सर्व निर्णय हे देवेंद्र फडणवीस घेतात. एकनाथ शिंदे हे फक्त नावापुरते मुख्यमंत्री आहेत. फडणवीस सांगतील तसे वागावे लागते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या हातातील बाहुली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.