TOD Marathi

गेले दोन दिवस निवडणूक आयोग ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला कुठलं नाव देणार? कुठलं चिन्ह देणार? याबाबत चर्चा सुरू होत्या. सोमवारी याबाबतचा निर्णय येणे अपेक्षित होतं. मात्र संध्याकाळपर्यंत या संदर्भातला कुठलाही निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला नव्हता. मात्र, काहीच क्षणांपूर्वी निवडणूक आयोगाने या संदर्भात माहिती दिली आहे. उद्धव ठाकरेंना ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव पक्षासाठी तर ‘मशाल’ हे पक्षचिन्ह म्हणून दिलेलं आहे.

त्यासोबतच एकनाथ शिंदेंना ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव पक्षाचे नाव म्हणून दिलेलं आहे. मात्र, पक्ष चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना कुठलंही दिलेलं नाही. आणखी तीन पर्याय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना मागितले आहेत. त्या तीन निवडणूक पक्ष चिन्ह पर्यायांपैकी एक चिन्ह निवडणूक आयोग देऊ शकेल. जी चिन्ह ठाकरे गटाने आणि शिंदे गटाने दिली होती त्या चिन्हांपैकी काही चिन्ह हे नियमानुसार देता येत नाही तर काही चिन्ह ही पूर्वीच विविध पक्षांचे निवडणूक चिन्ह म्हणून देण्यात आलेले आहेत.