TOD Marathi

पुणे:
कोरोना सारख्या जीवघेण्या महामारीनंतर पुन्हा एकदा गोवर या दुसऱ्या संसर्गजन्य साथीने डोकं वर काढलं आहे. प्रशासन तसेच अनेक पालक देखील यामुळे चिंतेत पडले आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तसेच ही साथ पसरू नये यासाठी रूबेला गोवर लसिकरण (Rubella and Gover Vaccination)  मोहीम राबवण्यात येत आहे.

गोवरच्या शिरकावाने राज्यात मुंबई मधील लहान बालकांमधील मृत्यू दर देखील वाढला आहे. त्यानंतर गोवरने पिंपरीमध्ये शिरकाव करून प्रशासन आणि पालकांना धास्तावून सोडले आहे. शहरात आत्तापर्यंत ५ गोवरचे बाल रुग्ण आढळले असून या व्यतिरिक्त ७ संशयित गोवरचे रूग्ण आढळून आले आहेत.

या ५ बाल रुग्णांमध्ये ४ मुली व १ मुलगा असून सर्व बालके ९ वर्षांच्या आतील आहेत. पिंपरीतील कुदळवाडी (Pimpri , Kudalwadi) या ठिकाणी हे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासन या ठिकाणी लक्ष केंद्रित करत आहे, असे पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह (Municipal Commissioner and Administrator Shekhar Singh) यांनी सांगितले आहे. तसेच ज्या बालकांचे गोवर लसीकरण झाले नाही, त्यांचे त्वरित लसीकरण करून घेण्यास प्रशासनाकडून सूचित करण्यात येत आहे.

आता संपूर्ण शहरात गोवरचा सर्व्हे करण्यात येतोय. अंदाजे ९९ हजार घरांचा यामध्ये सर्व्हे करण्यात येत आहे. साधारण ११ हजार बालकांना व्हिटॅमिन ए ची मात्रा देण्यात आली आहे. दर एक हजार बालकांना रुबेला गोवर पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. पिंपरीचे वैद्यकीय संचालक तसेच वैद्यकीय आधिकरी डॉ. पवन साळवे यांनी याबद्दलची माहिती दिली.