पुणे: पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचं समोर आलं आहे. परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या गट ‘क’ प्रवर्गासाठी आयोजित परीक्षेचा सावळा गोंधळ सुरूच असल्याचे दिसत आहे.
परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या आहेत तर, काही जणांना प्रश्नपत्रिका मिळालेल्या नाहीत. आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकार, आरोग्य विभागाविरोधात संताप केला आहे. असाच प्रकार नाशिकमध्ये देखील बघायला मिळाला आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ चालू असल्याचे दिसत आहे. एकच परीक्षा दोन दोन वेळा द्यायला यावं लागत आहे. प्रवासाचा खर्च त्याच सोबत राहण्याची सोय इत्यादी सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना बघाव्या लागतात मात्र हे या सरकारला कळत नाहीये असं दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनंगटीवार म्हणाले, परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांची निवड करताना मोठा भ्रष्टाचार झाला आहे. परीक्षा कंपन्या घेणाऱ्या ब्लॅक लिस्ट मध्ये होत्या. कंपन्यांना ब्लॅक लिस्ट असूनही त्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असू शकतो.