टिओडी मराठी, मुंबई, दि. 31 जुलै 2021 – कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये मुंबईतील झोपडपट्टी विभागामध्ये थैमान घातले होते. याच झोपडपट्टी परिसरातून आता मोठा दिलास देणारी माहिती समोर आलीय. मुंबईतील 24 वॉर्डमध्ये केवळ 2 वॉर्ड्समध्ये 3 कंटेन्मेंट झोन आता शिल्लक राहिलेत. म्हणजेच इतर वॉर्डमधील झोपडपट्टी विभाग हे कंटेन्मेंट झोनच्या बाहेर आहेत. तर काही इमारतींचा परिसर अजूनही कोरोनामुळे त्रासदायक ठरत आहे. झोपडपट्टी परिसर हा कोरोनमुक्तीकडे वाटचाल करत आहे.
याबाबत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईतील कोरोनाच्या स्थितीचे आकडे पाहून लक्षात येते की, आता कमी प्रमाणात कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. मात्र, इमारतींचे मजले हे सुरक्षिततेच्या कारणास्तव सील केले आहेत.
एखाद्या इमारतीच्या मजल्यावर एक किंवा दोन रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जात नाही तर, केवळ मजला सील केला जात आहे.
इमारतींत राहणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. आता मुंबईमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या ही 300 ते 400 रुग्णांच्या आसपास आहे. नागरिकांनी अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन केल्यास रुग्णसंख्या आणखी कमी होण्यास मदत होईल.
मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्क्यांवर पोहोचलाय. तर रुग्ण दुपटीचा दर हा वाढत आहे. मुंबईमधील कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट 1434 दिवसांवर पोहोचला आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची लक्षात घेता मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. 24 वॉर्डपैकी 22 वॉर्डमध्ये एकही कंटेन्मेंट झोन नाही.
केवळ गोवंडी परिसरामध्ये 2 आणि कांदिवली परिसरात 1 कंटेन्मेंट झोन आहे. इथे 0.31 लाख लोकसंख्या आहे. मुंबईत एकूण 55 मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. म्हणजेच 55 इमारतींपैकी 5 इमारतींमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अधिक आहे.
आतापर्यंत 1636 फ्लोर सील –
मुंबईतील एकूण इमारतींपैकी 1636 मजले हे सील केलेत. यावरुन अंदाज वर्तवता येऊ शकतो की, मुंबईतील एकूण दैनंदिन रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण हे इमारतींत राहणारे आहेत.