TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 26 जून 2021 – ओबीसी आरक्षण मुद्यावरून राज्यात विविध ठिकाणी भाजपकडून चक्काजाम आंदोलन केले जात आहे. पुण्यात पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी, ‘जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही’, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे. तर, बीडमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांचे चक्काजाम आंदोलन केले.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. हे सरकार सत्तेत आल्यानंतर इम्पिरिअल डेटा सादर करू शकलेले नाही. मागील 15 महिन्यांपासून या सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

मन मोठे करून निर्णय घेतलापाहिजे. पण, महाविकास आघाडी सरकार असे कोणतेही निर्णय घेत नाही. त्यामुळे जनता या सरकारला माफ करणार नाही. ओबीसी समाजातील लोकांसोबत भाजप आहे. त्यामुळे आरक्षण मिळवून देणार, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

जोपर्यंत स्थानिका स्वराज संस्थेत ओबीसी आरक्षण जाहीर होत नाही. तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही. पाच जिल्ह्यात निवडणुका जाहीर झाल्यात. हे सरकार निवडणूक आयोगाला पत्र देत आहे.

पण, यांनी जर विरोधी पक्षाला सोबत घेऊन एक समिती स्थापन करून निवडणूक आयोगाला विनंती केली तर निवडणूक पुढे ढकलता येतील. पण, हे सरकार आरक्षण रद्द होण्याची वाट पाहत आहे, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.

या दरम्यान, पंकजा मुंडे यांनी चक्का जाम आंदोलन केले. त्यानंतर परळीत खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन सुरू आहे. या चक्का जामला जाण्यापूर्वी खासदार प्रीतम मुंडे यांनी ओबीसीचे नेते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

बीड जिल्ह्यात सुमारे 24 ठिकाणे चक्का जाम आंदोलन करणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त केला आहे. या आंदोलनात अनुचित प्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

या चक्काजाम नंतर राज्य सरकारने ओबीसी अरक्षणा संदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा खासदार प्रीतम मुंडे यांनी दिलाय.