TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 13 जुलै 2021 – खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलंय. त्यानंतर पहिल्यांदा पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, असे सांगतानाच मी तुमच्या सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे, असं देखील पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी आज वरळीमध्ये पक्ष आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना दिल्लीत नेमकं काय घडलं? याची माहिती दिली. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मी असुरक्षित नाही. मला कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही. त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे राजीनामे नामंजूर करत आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

यावेळी पंकजा मुंडे यांनी दबावतंत्र करत नाही, असे स्पष्ट केलं. मला दबाव तंत्र करायचं असेल तर ही ती जागा नाही. त्यासाठी ही जागा पुरणार नाही. त्यासाठी वेगळी जागा लागेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

काल मी दिल्लीत गेले होते, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केली. तुम्ही कार्यकर्त्यांना समजवाल, हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला झापल्याच्या बातम्या आल्यात. मी फटकार खावून तुमच्यापुढे आली असेल असं वाटतं का?, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मला केंद्रात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. तेव्हा मी मंत्रिपद नाकारलं होतं. आता मी पद मागेल का?, असा सवाल देखील पंकजा मुंडे यांनी केला.